------------------------------------------------
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे-खंड १८_भाग ३_प्र.क्र. २५० (पृष्ठ ७५)* ------------------------------------------------
*समाजाचे विश्वासू नेते बना आणि*
*समाजाला योग्य मार्गदर्शन करा*
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
मुंबईच्या सिद्धार्थ काॅलेज वसतिगृहातील दलित वर्गीय विद्यार्थ्यांतर्फे ता. ४ ऑक्टोबर १९४७ रोजी सायंकाळी परमपूज्य नामदार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना "अल्पोपहार" देण्यात आला. प्रथम प्रास्ताविक भाषण श्री. भास्करराव भोसले यांनी केले. त्यांचे भाषण थोडक्यात पण खणखणीत आणि रसभरीत झाले. यानंतर विद्यार्थी वर्गाला उद्देशून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपदेशाचे चार शब्द सांगितले. ते म्हणाले,
आपल्या विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. आपला राजकीय लढा संपलेला नाही. त्यासाठी शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या झेंड्याखाली सर्वांनी आपली संघटना वाढविली पाहिजे. आपले आचरण शुद्ध ठेवून आपल्या इच्छित ध्येयासाठी जागरुक राहिले पाहिजे. आजच्या परिस्थितीत आपले मनोरथ जरी साध्य झाले नाही तरी ते आम्ही साध्य करूच करू अशा निश्चयाने वागले पाहिजे. तुमच्याकरिता मी या काॅलेजात अनेक प्रकारच्या सवलती ठेवलेल्या आहेत. त्याचा योग्य तो फायदा करून घ्या. आज आपला पक्ष राजकारणात जरी डावलला गेला असला तरी आम्ही भावी काळात आमचे ध्येय साध्य करून घेऊ आणि आपला पक्ष विजयी करू. इंग्लंडच्या मजूर पक्षाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. तो पक्ष फारच लहान होता आणि त्याला पदोपदी अपयशही आले होते. पण सतत चिकाटीमुळे तो पक्ष आज अधिकारारुढ झाला आहे. आपल्याला काँग्रेसमध्ये घुसलेल्या हरिजनांनी फसविले आहे. तेव्हा या सर्वांगीण परिस्थितीचा.विचार करून प्राप्त परिस्थितीला टक्कर देण्यासाठी तुम्ही आपल्या समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा. असा तुम्हाला माझा आदेश आहे.
डाॅ. बाबासाहेबांच्या या भाषणानंतर अॅड. बी. सी. कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व हा छोटासा समारंभ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे जयघोषात संपला. 🔸️🔸️🔸️
0 Comments